Ad Code

Responsive Advertisement

महा विस्तार शेतकरी ॲप शेतकऱ्यांपर्यंत कृषीज्ञान पोहचविण्यासाठी एक व्यासपीठ : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले


सोलापूर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांपर्यंत अधिकृत, विश्वासार्ह व आधुनिक कृषी ज्ञान पोहोचवण्यासाठी विकसित करण्यात आलेले ‘महाविस्तार-AI (MahaVISTAAR-AI) शेतकरी अॅप’ हे एक सशक्त डिजिटल व्यासपीठ म्हणून पुढे आले आहे. पीक अवस्था निहाय मार्गदर्शन, स्थानिक हवामानावर आधारित सल्ला, कीड-रोगांचे पीकनिहाय इशारे तसेच एआय-सक्षम चॅटबॉटद्वारे संवाद अशी या अॅपची वैशिष्ट्ये असून, शेतकऱ्यांना अचूक सल्ला मिळण्यास मदत होत आहे.महिला शेतकऱ्यांचा शेती व संलग्न कामांमधील सहभाग लक्षणीय असूनही, संस्थात्मक व सामाजिक अडथळ्यांमुळे त्यांना अनेकदा औपचारिक व विश्वासार्ह कृषी माहिती उपलब्ध होत नाही. ही बाब लक्षात घेऊन दि. १० ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राज्यव्यापी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेत प्रत्येक गावात जाऊन महिला शेतकऱ्यांना ‘महाविस्तार-AI’ अॅप डाउनलोड व वापरासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या अनुषंगाने महिला शेतकऱ्यांसाठी विशेष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे.या उपक्रमात जमीन मालकी हक्क विचारात न घेता, शेती किंवा संबंधित कृषी कामात गुंतलेली कोणतीही महिला ‘शेतकरी’ म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. स्मार्टफोन नसलेल्या महिलांसाठी गट-आधारित प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांद्वारे सहभाग सुनिश्चित करण्यात येणार आहे.मोहिमेच्या यशासाठी कृषी ताई, कृषी सखी, पशु सखी, महिला बचत गट (SHGs) व विविध महिला संघटनांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. महिला शेतकऱ्यांचा पुरेसा सहभाग मिळावा यासाठी गावपातळीवर आगाऊ प्रचार, पूर्वसूचना तसेच त्यांच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांनुसार बैठकींच्या वेळा नियोजित केल्या जाणार आहेत. अॅपची वैशिष्ट्ये व चॅटबॉट वापर स्पष्ट करणारे लघु व्हिडिओ तयार करून विविध माध्यमांतून प्रसारित केले जाणार आहेत. तसेच क्षेत्रीय स्तरावर प्रात्यक्षिकांसाठी कृषी, विज्ञान व ग्रामीण विकास पार्श्वभूमी असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.गुगल प्ले स्टोअरवरून आजच ‘महाविस्तार-AI’ अॅप डाउनलोड करून शेतीतील डिजिटल क्रांतीचा भाग व्हावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments