सोलापूर - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात बदल्यांचे वारे वेगाने वाहू लागले असून विविध सात संवर्गांतील तब्बल ९८ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत. सलग तिसऱ्या दिवशीही बदली प्रक्रिया सुरू राहिल्याने जिल्हा परिषद कर्मचारी वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बदल्यांमध्ये ८१ प्रशासकीय तर १७ विनंती बदल्यांचा समावेश आहे. औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच कुष्ठरोग तज्ज्ञ आदी विविध पदांवरील कर्मचाऱ्यांच्या पदस्थापनांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेत विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असून पहिल्या दिवशी २५, दुसऱ्या दिवशी १७ आणि तिसऱ्या दिवशी तब्बल ९८ कर्मचाऱ्यांचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत एकूण १४० कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. आरोग्य विभागात सर्वाधिक बदल्या झाल्या असून त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचा क्रमांक लागतो. काही कर्मचाऱ्यांना इच्छित ठिकाणी बदली मिळाल्याने समाधान व्यक्त होत असताना, काहींमध्ये नाराजीचे सूरही उमटत आहेत. प्रशासनाने मात्र शासन नियमांनुसारच संपूर्ण बदली प्रक्रिया पार पडल्याचा दावा केला आहे.
0 Comments