सोलापूर- सोलापूर जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत आषाढी वारीसाठी तब्बल ११ कोटी रुपयांच्या औषध खरेदीला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे हा विषय मूळ अजेंड्यावर नसतानाही ‘आयत्या वेळेचा विषय’ म्हणून सभेत मांडण्यात आला आणि त्यास एकमताने मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून १ कोटी, तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या सभेत शिक्षण, आरोग्य, शेती, पशुसंवर्धन, डीपी-ट्रान्सफॉर्मर, शिक्षकांची कमतरता आणि जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. मात्र अनेक विषयांवर ठोस निर्णय न झाल्याने सदस्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले.
विरोधी पक्षनेते नसल्याने अनेक विषय भरकटल्याचे चित्र सभागृहात दिसून आले. अखेर सभागृह नेत्या रश्मी बागल यांनी हस्तक्षेप करत चर्चा आटोपती घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पुढील सभेत सविस्तर चर्चा करण्याचे आणि आठ दिवस आधी लेखी माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सभेत बोरामणी गटाचे सदस्य नेताजी खंडागळे यांनी जिल्हा परिषद आवारात व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव मांडला. माढा तालुक्यातील सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी माढा चौकात व्यावसायिक गाळे उभारण्याची सूचना केली. माथाडी प्रतिनिधी अतुल पवार यांनी जागा भाडेतत्त्वावर देण्याची मागणी केली.
यावेळी रिक्त पदे भरणे, शाळांमध्ये शिपाई नेमणे, प्रत्येक तालुक्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करणे, नेहरू वस्ती योजनेतील स्वच्छता, तसेच पंढरपूर येथील बंद वसतिगृह पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. बोरामणी गटातील अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. आषाढी वारी नियोजनाबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी जर्मन हँगर, पाणीपुरवठा, शौचालये आणि मोबाईल ट्रॉली यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती दिली.
सभेला शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करून अनेक जनहिताचे ठराव मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढी संदर्भात चर्चा करण्यात आली. सभेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली. यापुढील सभेसाठी सदस्यांनी आपले विषय सभेच्या पूर्वी कळवावेत, असे आवाहन करण्यात आले.
*- इंद्रजीत पवार, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर*
सभेमध्ये शेतकरी, पशुपालक, महिला, दिव्यांग बांधव, विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या योजनांवर विशेष भर देण्यात आला. पशुसंवर्धन विभागाच्या विविध उपक्रमांसह कुक्कुट विकास योजना, दिव्यांगांसाठी शेळीगट व ई-बाईक योजना, अंगणवाडी सक्षमीकरण, ग्रामीण रस्ते व पूल विकास अशा विविध विषयांना सभागृहाने मंजुरी दिली. जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला चालना देतानाच सामाजिक बांधिलकी जपणारे निर्णय या सभेत घेण्यात आल्याने सदस्यांनी समाधान व्यक्त केले. विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.
*- दीपक वैद्य, अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर*
0 Comments